जळगाव मिरर | 30 ऑगस्ट 2026
महायुतीचा घटक पक्ष असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर डावलले जात असल्याची तीव्र भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रावेर लोकसभा जिल्हा आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आली. निवडणुकीच्या वेळी महायुतीत सोबत घ्यायचे आणि इतर वेळी मात्र राष्ट्रवादीला दुय्यम वागणूक द्यायची, असा प्रकार भाजप व शिवसेनेकडून सुरू असल्याचा सूर बैठकीत उमटला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रावेर लोकसभा जिल्ह्याची मासिक आढावा बैठक शनिवारी (दि. २९) येथील शासकीय विश्रामगृहात पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
जिल्ह्यात अमळनेर मतदारसंघातून माजी मंत्री अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. जिल्ह्याच्या पूर्व भागातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून शासकीय कार्यक्रम, बैठका तसेच महायुती सरकारच्या निधीतून मंजूर विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले जात नसल्याची खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली. विविध कार्यक्रमांबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी कोणताही समन्वय साधला जात नसल्याने स्थानिक पातळीवर अडचणी निर्माण होत असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.
पालकमंत्री व महाजन यांच्यासमोर मांडणार वस्तुस्थिती
बैठकीतील भावना लक्षात घेऊन भाजप व शिवसेनेने महायुती धर्म पाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला योग्य तो मानसन्मान द्यावा व समन्वयाची भूमिका ठेवावी, यासाठी रावेर लोकसभा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांची लवकरच भेट घेणार आहे. या भेटीत स्थानिक पातळीवरील सर्व वस्तुस्थिती मांडून त्यावर तोडगा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
संघटनात्मक बांधणीवर भर
जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी अध्यक्षीय भाषणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मांडलेल्या सूचना आणि अडचणींवर सविस्तर भाष्य केले. जिल्ह्यात पक्षाच्या संघटनात्मक कार्याला बळ मिळावे, यासाठी बैठकीत मांडण्यात आलेले प्रश्न प्रदेश पातळीवर पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णयासाठी आग्रही पाठपुरावा करण्याचे ठरले.
बैठकीत एसआयआर प्रक्रियेत नव्याने जाहीर होणाऱ्या मतदार याद्यांची पडताळणी करण्यावर चर्चा झाली. मतदार यादीतून नावे वगळली गेली असल्यास किंवा अनोळखी नावांचा समावेश असल्यास तक्रारी दाखल करण्यासाठी पक्षाच्या बूथस्तरीय बीएलएंच्या माध्यमातून विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
विशेष कार्यकारी दंडाधिकारी या अशासकीय पदांवर पक्षाच्या इच्छुकांची नियुक्ती व्हावी, यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरून यादी तयार करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गट व गणनिहाय पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. रावेर लोकसभा मतदारसंघातील विविध तालुकाध्यक्षांनी आपापल्या भागातील तयारीची माहिती दिली.
नेत्यांचे मार्गदर्शन, पदाधिकाऱ्यांचे मनोगत
सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आणि ज्येष्ठ नेते भगतसिंग पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रावेरचे उपनगराध्यक्ष असिफ दारा शेख, जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, ओबीसी जिल्हाध्यक्ष डॉ. सोपान दुट्टे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष कुर्बान शेख, चोपडा तालुका सूतगिरणीचे संचालक शशिकांत पाटील, राष्ट्रवादी युवकचे अक्षय सोनवणे तसेच युवती जिल्हाध्यक्ष कु. भाग्यश्री ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
बैठकीस भुसावळ शहराध्यक्ष नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी, माजी उपनगराध्यक्ष आशिक खान शेरखान, जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत निळ, यावलचे माजी उपनगराध्यक्ष मुस्तफा शेख, भुसावळ तालुकाध्यक्ष विलास पाटील, रावेरचे योगेश पाटील, बोदवडचे निवृत्ती ढोले, मुक्ताईनगरचे गोपाळ पाटील, यावलचे कार्याध्यक्ष जितेंद्र सोनवणे, यावलचे नगरसेवक कदीर खान, भुसावळचे नगरसेवक निलेश कोलते, मुक्ताईनगरचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ बागवान, फैजपूर शहराध्यक्ष रज्जाक शेख, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, अॅड. देवकांत पाटील, प्रा. अर्जुन पाटील, चोपड्याचे प्रशांत पाटील, किशोर दुसाने, डॉ. भरत धनगर, यावल महिला शहराध्यक्ष सौ. योगिता घोडके, रावेर तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इरफान शेख, भाऊसाहेब साळुंखे, शशिकांत देवरे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे, नईम बागवान, धर्मराज तायडे, शेख अलीम, प्रकाश पाटील, अतुल पाटील, विनोद पाटील, भुसावळ तालुका युवक अध्यक्ष अतुल चव्हाण, भुसावळ तालुका युवती अध्यक्ष सुमय्या सलीम पिंजारी, शेरखान जुबेर खान, जफर अली अजगर अली, वीरेंद्र मोरे, शेख वसीम शेख गफ्फार, वैभव महाजन, युनूस खान नसीर खान, समाधान पाटील, प्रेम यशवंत धांडे, मिलिंद कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.





















