जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२६
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे मैत्रीचे संबंच असल्याचा गैरफायदा घेत एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग करून तिचा मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघांचे मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटण्यासाठी दबाव टाकणे, यात्रेदरम्यान हात पकडूनजवळ ओढणे तसेच वारंवार शारीरिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप विद्यार्थिनीने केला आहे. याप्रकरणी तळवेल येथील तरुणाविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी वरणगाव येथील विद्यालयात इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून सीईटीच्या तयारीसाठी सध्या जळगाव येथे मैत्रिणीसोबत राहते. गावातील ओळखीतून तिची तरुणाशी मैत्री झाली होती. मात्र, कालांतराने या मैत्रीचे रूपांतर त्रासदायक प्रकारात झाल्याचा आरोप आहे. दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी वरणगावातील नागेश्वर मंदिराच्या यात्रेत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. तरुणाने विद्यार्थिनीचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढले आणि लाज वाटेल असे कृत्य केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता, त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटो असून ती त्याला भेटण्यासाठी आली नाही तर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकारानंतर विद्यार्थिनीने आपला मोबाईल क्रमांक बदलला. मात्र, संबंधित तरुण तिच्या मित्र-मैत्रिणींकडून नवीन क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. वरणगावात कॉलेजसाठी आल्यानंतर पाठलाग करून ‘तुझ्याशी बोलायचे आहे’ असे म्हणत त्रास देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर विद्यार्थिनीने ३ ऑक्टोबर रोजी कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आई-वडील व नातेवाईकांसह पोलीस ठाणे तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.




















