जळगाव मिरर | १५ नोव्हेंबर २०२६
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग चिकित्सा शास्त्र विभागामध्ये बालदिनानिमित्त शनिवार दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी बालदिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि रुग्णालयातील वातावरण अधिक बालमैत्रीपूर्ण बनवणे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. संगीता गावित, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, सहायक अधिसेवक तुषार पाटील आणि बालरोग चिकित्सा शास्त्र विभागाचे डॉ. बाळासाहेब सुरोशे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात करताना प्रास्ताविकात डॉ. सुरोशे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती व प्रास्ताविक मांडले. यावेळी बालदिन हा केवळ उत्सव नसून प्रत्येक बालकाला प्रेम, जिव्हाळा, योग्य पोषण, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा आणि सुरक्षित वातावरण मिळावे, याची जाणीव करून देणारा दिवस असल्याचे अधोरेखित करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना खेळणी, खाऊ आणि उबदार कपडे यांचे वाटप करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण, पोषण आणि सुरक्षिततेचे महत्त्व विशद केले. बालगुणांना उपचारांसोबतच मानसिक आधार, प्रेम आणि सहानुभूती देणे हीदेखील आरोग्यसेवेची महत्त्पूर्ण जबाबदारी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. याप्रसंगी बोलताना अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी सांगितले की, “बालकांचे हसू, आरोग्य आणि सुरक्षित भविष्य हीच समाजाची खरी संपत्ती आहे.”
बालरोग विभागातील सर्व डॉक्टर, परिचारिका, निवासी डॉक्टर, इंटर्न्स आणि कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा सोहळा अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक प्राध्यापक डॉ. कौस्तुभ चौधरी, डॉ. भावना पाटील, डॉ. गोकुळ बाविस्कर, डॉ. हसनैन देशमुख, डॉ. महेश पाटील, डॉ. कृतिका पांडे, डॉ. पवन रेड्डी, डॉ. हर्षवर्धन मोरे, डॉ. श्रद्धा चापके, डॉ. किरण मुंडे, डॉ. योगिता तिडके यांच्यासह इन्चार्ज सिस्टर श्रद्धा सपकाळ आणि निता दुसाने यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.





















