श्रीनगर : वृत्तसंस्था
काश्मीरच्या पहलगाम येथील चंदनवाडी परिसरात जवानांची एक बस दरीमध्ये कोसळली. पहलगामच्या बेताब खोऱ्यात ही दुर्घटना घडली. या बसमध्ये 39 जवान होते. दुर्घटनेत अनेक जवानांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे.
ITBP ने दिलेल्या माहितीनुसार, 39 कर्मचारी (ITBP मधील 37 आणि JKP मधील 2) घेऊन जाणारी सिव्हिल बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नदीच्या पात्रात कोसळली. बसचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. हे जवान चंदनवारीहून पहलगामकडे निघाले होते. प्रकरणात घातपाताची भीती व्यक्त केली जात आहे.
आयटीबीपीच्या वाहनाच्या अपघातात सहा जवानांच्या मृत्यूची पुष्टी झाल्याचे बचाव पथकाच्या पथकांनी सांगितले आहे. मृत जवानांची संख्या 10 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या भीषण अपघातात अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात झाल्यानंतर काही वेळातच अनंतनाग रुग्णालयात एकामागून एक रुग्णवाहिकेचा आवाज सुरू झाला. अनंतनागच्या उपायुक्तांनी दिव्य मराठीला सांगितले की, त्यांनी तात्काळ मदत आणि बचावासाठी 19 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. अपघातानंतर संपूर्ण यंत्रणा मदत आणि बचाव कार्यात गुंतली. यानंतर अनंतनागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जखमी जवानांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. कोणाचे डोके फुटलेले आहे, तर कोणाच्या हातातून रक्तस्त्राव होत आहे. सुमारे ३ तास ही गोंधळाची स्थिती कायम होती.
अपघातानंतर ITBPचे DIG रणबीर सिंह तातडीने घटनास्थळी पोहोचले. ते म्हणाले- ‘या अपघातात 7 जवानांचा मृत्यू झाला असून 16 जवान गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी जवानांना विमानाने श्रीनगरच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.जेव्हा डीआयजी रणबीर सिंह यांना विचारण्यात आले की हा अपघात कोणाच्या चुकीमुळे झाला? प्रत्युत्तरादाखल ते म्हणाले की, ‘सध्या बसचा चालक अजून शुद्धीवर नाही. त्वरित मदत आणि बचाव कार्ये पार पाडणे हे आमचे प्राधान्य आहे. गंभीर अवस्थेत असलेल्या जवानांना आम्ही एअरलिफ्ट करून श्रीनगरला पाठवले आहे.
अपघातात 7 जवान शहीद
हेड कॉन्स्टेबल दुला सिंग (तरन तारण, पंजाब), कॉन्स्टेबल अभिराज (लखीसराय, बिहार), कॉन्स्टेबल अमित के (एटा, यूपी), कॉन्स्टेबल डी राज शेखर (कडप्पा, आंध्र प्रदेश), कॉन्स्टेबल सुभाष सी बैरवाल (सीकर राजस्थान) कॉन्स्टेबल दिनेश बोहरा (पिथौरागढ, उत्तराखंड) आणि कॉन्स्टेबल संदीप कुमार जम्मू. अशी शहीद झालेल्या ITBP जवानांची नावे आहेत.