मुंबई : वृत्तसंस्था
देशभरासह राज्यात आज दहीहंडीचा उत्साह आहे. बहुधा राज्यात मुंबई आणि ठाण्यात खूप मोठा उत्साह पाहायला मिळतोय असतोय. मुंबई आणि ठाण्यात ठिकठिकाणी मोठमोठे दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सर्वच ठिकाणी दहीहंडीचा उत्साह आहे. पण या उत्साहादरम्यान काही अनपेक्षित घटना समोर येत आहे. मुंबईच्या वरळी येथील जांबोरी मैदानावर आयोजित भाजपच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात एक दुर्घटना घडली आहे. एक गोविंदा थेट सहाव्या थरावरुन कोसळला आहे. या दुर्घटनेत संबंधित गोविंदा हा जागेवरच बेशुद्ध झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याला बेशुद्ध अवस्थेतच केईएम रुग्णालयात नेण्यात आलंय.
मुंबईच्या जांबोरी मैदानावर भाजपकडून दहीहंडीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात थर रचताना एक गोविंदा सहाव्या थरावर पोहोचला होता. पण अचानक तोल गेला आणि तरुण थेट जमिनीवर कोसळला. या तरुणाचं नाव करण सावंत असं आहे. तो 22 वर्षांचा आहे. त्याला तातडीने उपचारासाठी केईएम रुग्णालयात आणलं गेलं.
दरम्यान, गिरगाव कुंभारवाड्यातील ओमकार मित्र मंडळाचा एक गोविंदादेखील गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अजिंक्य माने असं या गोविंदाचं नाव आहे. या गोविंदाला खांद्याला गंभीर दुखापती झाल्यामुळे केईएम रूग्णालयामध्ये आज त्याच्या खांद्याची सर्जरी करण्यात येणार आहे.
जखमी गोविंदांबद्दल विविध सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांची माहिती:
जे जे हॉस्पिटल – 02
सेंट जॉर्ज हॉस्प – 03
जी टी हॅास्पिटल – 11
नायर रुग्णालय – 09
केईएम रुग्णालय – 17
सायन रुग्णालय – 07
ट्रॉमा हॉस्पिटल – 02
कूपर हॉस्प – 06
डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्पीटल, कांदिवली – 01
व्ही एन देसाई हॉस्पिटल – 06
राजावाडी रुग्णालय – 10
पोद्दार रुग्णालय – 04
एकूण 78 जखमींची नोंद झाली असून त्यापैकी 67 जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. सध्या 11 गोविंदांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आतापर्यंत कोणतीही अनुचित घटना नोंदवली नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.




















