जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२५
राज्यातील अएंक ठिकाणी चुकीचे कृत्य होत असल्याच्या घटना घडत असतांना आता अमरावती चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावात एका २४ दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम सळईसदृश्य वस्तूने ६० ते ६५ डागण्या दिल्या. या अघोरी उपचारामुळे या बाळाची प्रकृती गंभीर झाली. त्याच्यावर अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी बाळ व्हेंटिलेटरवर आहे. आईनेच हे चटके दिल्याचा संशय आहे. याप्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून आईविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मेळघाटातील सिमोरी येथील एका २४ दिवसांच्या बाळाचे पोट फुगले. मेळघाटात अशा आजाराला डंबा किंवा फोपसा म्हणतात. डंबा उतरवण्यासाठी या बाळावर दोन दिवसांपूर्वी गावातच अघोरी उपाय करून ६० ते ६५ डागण्या देण्यात आल्या. त्यामुळे पोटावर जागोजागी व्रण उमटलेले दिसतात. या चटक्यांमुळे बाळाची प्रकृती चिंताजनक झाल्याने २४ फेब्रुवारीला बाळाला हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, बाळाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्याला अमरावतीच्या रुग्णालयात पाठवण्यात आले.उर्वरित. पान २
शून्य ते एक वर्षापर्यंत वयाच्या बाळांना पोट फुगण्याचा आजार होऊ शकतो, त्याला फोपसा किंवा डंबा अशा नावाने ओळखतात. बाळ ज्या वेळी आईचे दूध पिते, दूध पिल्यानंतर आईने बाळाला खांद्यावर घेऊन त्याच्या पाठेवर कुरवाळणे गरजेचे आहे. त्यामुळे बाळाचा ढेकर निघून जातो. मात्र दूध पिल्यानंतर बाळाचा ढेकर न काढल्यास तसेच झोपवल्यास बाळाचे पोट फुगण्याची दाट शक्यता असते. पोट फुगल्यास बाळ नंतर दूध घेण्यास टाळाटाळ करते, उलटीसुध्दा होऊ शकते. त्यामुळे बाळाने दूध घेतल्यानंतर आईने त्याचा ढेकर काढलाच पाहिजे. ही माहिती आम्ही प्रत्येक मातेला देतो, असे डॉ. आदित्य पाटील यांनी सांगितले.
बाळाची प्रकृती बघता पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी नागपूर येथे बाळाला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असता कुटुंबियांनी याला विरोध करत नागपूर पाठवण्यास नकार दिला. यावेळी रुग्णालय प्रशासनाने कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीय वारंवार नकार देत आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मोहपात्र यांनीही कुटुंबीयांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. चिखलदरा तालुका आरोग्य प्रशासनाने सिमोरा गावात वैद्यकीय पथक चौकशीसाठी पाठवले आहे. चौकशीत बाळाला चटके देणारा शाेधून पोलिसात तक्रार देण्यात येईल, असे चिखलदराचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांनी सांगितले. पथक गावात गेले आहे, मात्र बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत पथकासोबत नेटवर्कअभावी संपर्क होत नसल्याचे त्यांनी सांगितले.