
जळगाव मिरर | २३ मार्च २०२५
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना पाचोरा शहरातील मोंढाळा रोडवर झालेल्या अपघातात २६ वर्षीय बांधकाम कारागिराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २२ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. तर हा अपघात नसुन घातपात झाल्याचा संशय मयताचा भाऊ याने व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील बहिरम नगर येथील रहिवासी हर्षल बाबुलाल तडवी (वय – २६ वर्ष) या तरुणाचा मोंढाळे रोडवर २२ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता मोटरसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हर्षल तडवी हा सायंकाळी मित्रास घरी सोडुन आपल्या घराकडे परतत असताना हर्षल यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळुन आला.
हर्षल यांचे डोक्यास गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हर्षल तडवी यांचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येवुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघात घडुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनिल निकम हे करीत आहे. मयत हर्षल तडवी यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे.