जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२५
एरंडोल येथील धरणगाव रस्त्यावरील आदर्श नगरमधील २९ वर्षीय युवकाने १० रोजी राहत्या घरात दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तर कुटुंबातील कर्त्या युवकाने गळफास घेवून जिवन संपवल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, आदर्शनगर येथील रोनित सुरेश ठाकरे (वय २९) या युवकाने १० रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरातील लोखंडी पाईपला सुताची दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. रोनितने राहत्या घरात गळफास घेतल्याचे दिसताच त्यांच्या आईने मोठा आक्रोश केला. त्यानंतर पती सुरेश ठाकरे यांना घटनेची माहिती दिली. रोनितचे वडील सुरेश ठाकरे त्वरित घरी आले व त्यांनी नागराज पवार, अनिल सोनवणे, बन्सीलाल सोनवणे यांच्या मदतीने रोनितला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत सुरेश ठाकरे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पो. नि. नीलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात हवालदार योगेश महाजन तपास करत आहेत. दरम्यान, रोनित ठाकरे यांचे वडील शेतमजूर असून त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे.
रोनित पाटील हा खासगी दुकानावर काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, २ विवाहित बहिणी असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. दरम्यान, परिवारातील कर्ता युवक गेल्याने त्याच्या कुटुंबीयांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.