जळगाव मिरर / २९ एप्रिल २०२३ ।
देशाचे पंतप्रधान मोदी हे विषारी साप असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विधान केल्याने देशभरातील भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी जळगाव शहराचे आ.सुरेश(राजू) मामा भोळे यांनी देखील थेट गांधी परिवाराचे संस्कार काढले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका करणे व त्यांच्या आडनावावरून पोरकट वक्तव्ये करणे महागात पडते हे आता सोनिया, राहुल गांधी व वाड्रा कुटुंबास पुरेपूर उमगले आहे. त्यामुळे आता पाळीव पोपटांच्या मुखातून असे उद्योग काँग्रेसने सुरू केले आहेत. मात्र यातून काँग्रेसचे नैराश्यच उघड होत असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी केला आहे.
याआधी गांधी परिवाराने पंतप्रधानांवर व्यक्तिगत चिखलफेक करताना राजकीय संस्कृती खुंटीवर टांगली होती. मौत का सौदागर, खून का दलाल अशा शब्दांत सोनिया गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली. तेव्हा देशातील जनतेनेच काँग्रेसला झिडकारले. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांमुळे तर त्यांना कायदेशीर कारवाईस तोंड द्यावे लागले असून अशाच बेताल वक्तव्यांमुळे त्यांना खासदारकीदेखील गमवावी लागली आहे.त्यामुळे आता गांधी परिवाराची भाषा त्यांचे निष्ठावंत हुजरे बोलू लागले आहेत. देशाच्या पंतप्रधानांविषयी अशी बेताल वक्तव्ये करून अगोदरच धुळीस मिळालेली पक्षाची प्रतिमा रसातळाला नेत असल्याचे भान काँग्रेसी पोपटांना नाही, पण जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशारा देतानाच, या वक्तव्याबद्दल सोनिया गांधी आणि पक्षाध्यक्ष खर्गे यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही आमदार भोळे यांनी केली आहे.