जळगाव मिरर / ११ नोव्हेंबर २०२२
राज्यात शिंदे गट गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिंदे गटात दाखल करून घेत आहे. तर आज शिवसेनेचे निष्ठावंत नेते म्हणून समजले जाणारे खासदार गजानन किर्तीकर हे देखील एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करणार आहेत.
गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. थोड्या वेळात रविंद्र नाट्य मंदिरात गजानन किर्तीकर शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय. कारण, पुढील काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी आणखी एक खासदाराने पक्ष सोडणं, पक्षासाठी घातक ठरू शकते.
कोण आहे किर्तिकर ?
शिवसेनेचे जेष्ठ नेते किर्तिकर हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, तसेच १९९० ते २००९ काळात ते चार वेळा आमदार देखील राहीले आहेत. युतीसरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. तसेत सलग दोन वेळा लोकसभा खासदार म्हणून त्यांची निवड झाली होती.
शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून गजानन किर्तीकर होते. त्यामुळे किर्तीकर शिंदेंबरोबर गेल्यास शिवसेनेची महत्त्वाची संघटना असलेली स्थानिय लोकाधिकार समितीदेखील शिंदे गटाबरोबर जाऊ शकते. त्याचा मोठा फायदा शिंदे गटाला होऊ शकतो. त्याशिवाय, गजानन किर्तीकर हे जुन्या पिढीतील शिवसैनिक आहेत. तेदेखील शिंदे यांच्यासोबत गेल्यास जुन्या शिवसैनिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वातावरण निर्माण होऊ शकते. किर्तीकर हे पक्षाच्या नेतेपदी असल्याने शिवसेना कार्यकारणीत फूट पडली असल्याचे समोर येईल. त्याचा फायदा शिंदे गटाला निवडणूक आयोगासमोरील आपलाच पक्ष खरा असल्याचे सिद्ध करण्यास होऊ शकतो, असे जाणकार सांगतात.