जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२५
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या कडगाव येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. संजय पोपट पाटील (वय २७ रा. कडगाव ता. जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील कडगाव येथे संजय पाटील हा तरूण आपल्या आईवडील आणि बहिणीसोबत वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून तो उदरनिर्वाह करत होता. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास संजय त्याचा मित्र गणेश बाबुराव बाविस्कर (वय ३५ रा. कडगाव) याच्या सोबत जळगावकडून कडगावकडे जाण्यासाठी निघाला होता. जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालया समोर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या धडकेत संजय जागीच ठार झाला तर सोबतचा मित्र गणेश बाविस्कर हा गंभीररित्या जखमी झाला. जखमीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संजयचे आई-वडील व नातेवाईकांनी यांनी रूग्णालयात धाव घेतली. एकुलत्या एका मुलाचा मृतदेह पाहताच दोघांनी मन हेलवणारा आक्रोश केला. यावेळी नातेवाईक व मित्रपरिवार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.