
जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२५
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.चव्हाण यांनी पोलीस विभागातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हे प्रकरण थेट पोलीस स्थानकात गेले मात्र रात्री पोलीस स्थानकाची बत्तीगुल झाल्यानंतर या प्रकरणातील देखील सर्वच हवा निघून गेली आहे. लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप पाटील हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. दरम्यान, या प्रकरणात शनिवारी तक्रार देण्यासाठी येणार असल्याचे सांगून गेलेल्या महिलेने आता आपली तक्रार नसल्याचे म्हटले आहे. तसे लेखी देण्यासाठी आपण पोलिस ठाण्यात येणार असल्याचे महिलेने पोलिसांना कळविले आहे. मात्र शनिवारी दिवसभर ही महिला एमआयडीसी पोलिस स्टेशनला आली नाही.
लग्नाचे आमिष दाखवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. तसेच, संबंधित महिला एमआयडीसी पोलिस ठाण्यातदेखील गेली होती. शुक्रवारी (२९ ऑगस्ट) दुपारपासून ती पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी थांबलेली असताना, उद्या तक्रार देण्यासाठी येणार असल्याचे सांगत रात्री ती परत गेली. मात्र, दुसऱ्या दिवशी, शनिवारी ती परत आलीच नाही. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी महिला पोलिस कर्मचारी महिलेच्या घरी गेल्या, मात्र तिने आपली तक्रार नसल्याबद्दल लेखी देण्यासाठी पोलिस ठाण्यात येणार आहे असे कळविले.
शुक्रवारी याप्रकरणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी गंभीर आरोप केले, नंतर ते स्वतः पोलिस ठाण्यात गेले. तसेच सदर महिला दुपारपासून पोलिस ठाण्यात सर्व घटनाक्रम सांगत होती, मात्र रात्री ती अचानक निघून गेली. त्यामुळे असे काय घडले की, ही महिला तक्रार न देता परत निघून गेली? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या प्रकरणात आरोप झाल्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप पाटील हे स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाले. तसेच, त्यांना तत्काळ पदावरून हटविण्यात आले. त्यानंतर ते आता १५ दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेले आहेत.
‘ते’ दोन बंधू शहरातून गायब ?
जिल्हाधिकारी कार्यालयात आ.चव्हाण यांनी माध्यमांना सांगितले कि, या प्रकरणात पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मणियार नावाच्या दोन जणांनी मदत केल्याचा आरोप करीत त्या दोघांकडे शस्त्र परवाना कशासाठी आहे, त्यांचा व्यवसाय काय आहे. त्यांना कुणाच्या शस्त्र परवाना कुठल्या आधारे मिळाला आहे व जर या प्रकरणात त्या दोन बंधूंची सीडीआरची तपासणी केल्यास या प्रकरणात महत्वाची माहिती समोर येणार असे देखील आ.चव्हाण यांनी म्हटले आहे. यावर आता शनिवारी त्या दोघांना चौकशीसाठी बोलवायचे असल्याने पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते जळगावात नसल्याचे पोलिसांना समजले, अशी माहिती सूत्रांनी दिली. शुक्रवारी आरोप झाल्यानंतर ते दोघेही शहरातून गायब असल्याचे सांगण्यात येत आहे.




















