चाळीसगाव : कल्पेश महाले
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा येथील दोन मुलासह बापाने तब्बल १४ लोकाची २९ लाख ४४ हजार रुपयाची फसवणूक केल्या प्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील संभाजी दगडू पाटील (वय ५५) त्याचा मुलगा अनिकेत संभाजी पाटील (वय२१) आकाश संभाजी पाटील (वय१९) यांनी संगनमताने स्वप्निल युवराज चौधरी यांची १२ लाख १० हजार व त्यांचे काका सोमनाथ मांगो चौधरी यांची ८ लाख १० हजारांची फसवणूक केली. मात्र त्यातील १ लाख रुपये नंतर त्यांनी त्यांना परत केले. झालेल्या फसवणूक प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला स्वप्निल चौधरी यांच्या फिर्यादीवरून आय.पी.सी. ४२०, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी हे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
वरील तिघांनी स्वप्निल चौधरी व सोमनाथ चौधरी यांना सीएनजी गॅस पंपाची परवानगी मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून २० लाख २० हजार एवढी रक्कम घेतली. शिवाय वरील तिघांनी पशुपालन योजनेचे कर्ज मंजूर करून देण्यासाठी अशपाक मुस्ताक पिंजारी यांच्याकडून १ लाख १० हजार, शरीफ मेहबूब पिंजारी (रा. कादरी नगर चाळीसगाव) यांचे कडून वरील कारणसाठीच १ लाख ७५ हजार रुपये घेतले. त्यातून शरीफ पिंजारीç यांना फक्त ५० हजार रुपये परत केले. राहिलेले १ लाख २५ हजार अद्यापही दिलेले नाही. शकील सत्तार मुजावर (रा.आदित्य नगर चाळीसगाव) यांच्याकडून पशुपालन योजनेचे कर्ज मंजूर करून देण्यासाठी १ लाख ७५ हजार रुपये घेतले. तसेच अमीन शब्बीर पिंजारी (रा.खेडगाव) यांचेकडूनही पशुपालन कर्ज मंजुरीसाठी ९० हजार रुपये घेतले त्यातून फक्त ५ हजार परत केले ८५ हजार परत केले नाही. आसिफ सुलतान पिंजारी (रा.खेडगाव) यांच्याकडून पशुपालन कर्ज मंजुरीसाठीच ८० हजार रुपये घेतले. आसिफ युसुफ पिंजारी (रा.बहाळ) यांच्याकडून पशुपालन कर्ज मंजुरीसाठीच ९० हजार रुपये घेतले.
शेख मुक्तार शेख मुस्ताक (रा.इस्लामपुरा घाट रोड चाळीसगाव) पर्सनल लोन मंजुर करण्यासाठी ३३ हजार ५०० रुपये घेतले त्यापैकी ८५०० परत केले २५००० हजार अजुन दिलेले नाही. ज्ञानेश्वर साहेबराव शेलार (रा.न्हावे) यांच्याकडून ट्रॅक्टर घेण्यासाठी चे कर्ज मंजूर करून देण्यासाठी ३८ हजार रुपये घेतले त्यापैकी १० हजार परत केले मात्र २८००० हजार रुपये परत केले नाही. विजय रामदास पाटील (रा.देवळी) पशुपालन योजनेचे कर्ज मंजूर करून देण्यासाठी ४६००० हजार रुपये घेतले त्यापैकी ५००० परत केले ४१००० हजार अद्याप दिलेले नाही. निलेश नंदलाल छोरीया (रा.रामवाडी चाळीसगाव) यांच्याकडून जमिनीचा व्यवहार करण्यासाठी २ लाख रुपये घेतले ते अद्याप परत केलेले नाही. सुकलाल रावण पाटील (रा.खरजई नाका चाळीसगाव) शेळीपालन व्यवसायाचे कर्ज मंजूर करून देण्यासाठी ५० हजार रुपये घेतले त्यातून १५००० हजार परत केले मात्र ३५००० हजार अद्याप परत केले नाही.
सलाम शेख दादामिया शेख (रा.वालझरी चाळीसगाव) यांच्याकडून पशुपालन व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून देण्यासाठी ५० हजार रुपये घेतले त्यापैकी २०,००० रुपये परत केले ३०,००० हजार रुपये अद्यापही दिलेले नाही. अशी एकूण २९ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक या तिघा भामट्यांनी संबंधितांची केलेली आहे. सदर फसवणुकीचा प्रकार २६/१०/२०२१ ते आज पर्यंत चाळीसगाव शहरातील ग्लोबल ऑनलाईन सेंटर, सिनियर टायर समोर, टाकळी प्र.चा. येथे घडला आहे. सदरील गुन्ह्यामधील आरोपी संभाजी दगडू पाटील आणि अनिकेत संभाजी पाटील यांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी आकाश संभाजी पाटील फरार आहे या प्रकरणात अजून काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. पुढील सर्व तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी, पो.कॉ.अमोल पाटील, प्रकाश पाटील हे तपास करीत आहेत.
