
जळगाव मिरर | २१ मार्च २०२६
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे या लवकरच विवाहबंधनात अडकणार असून पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेवती सुळे आणि नागपूरचे उद्योगपती सारंग लखानी यांचा विवाह 20 जून रोजी मुंबईत भव्य स्वरूपात पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा मुंबईतील एका प्रतिष्ठित ठिकाणी मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राज्य आणि देशभरातील अनेक नामांकित राजकीय नेते, उद्योगपती तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पवार आणि लखानी कुटुंबीयांकडून लग्नाच्या तयारीला वेग आला असून प्रत्येक बाब खास आणि लक्षवेधी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
विवाहानंतर विविध ठिकाणी स्वागत समारंभांचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिला रिसेप्शन मुंबईत होईल, तर वरपक्ष नागपूरचा असल्याने तेथेही विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. याशिवाय, पवार कुटुंबाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व लक्षात घेता दिल्लीतही भव्य स्वागत समारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा केवळ कौटुंबिक न राहता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही चर्चेचा विषय ठरणार आहे.
सारंग अरुण लखानी हे नागपूरचे रहिवासी असून ते विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. सारंग लखानी हे उद्योग क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय असून ते एक कुशल बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या विवाह जुळवण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी महत्त्वाची ठरल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्या शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असून बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी प्रथमच आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुले सुप्रिया सुळे यांना आहेत. रेवती सुळे यांच्या विवाहामुळे पवार कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण असून हा सोहळा राज्यातील एक चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे.




















