जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरातील जुना खेडी परिसरातील योगेश्वर नगरातील किराणा दुकानाला शनिवारी मध्यरात्री आग लागून ३० हजारांचा सामान जळून खाक झाला. या प्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. मात्र आग लागण्यापूर्वी दुचाकीस्वार दोन जण दुकानासमोर धावले व त्यानंतर स्फोट झाल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे दुकानाला आग लावून घातपात करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय या घटनेत व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील योगेश्वर नगरातील गोपाल सुरेश चौधरी यांच्या घराबाहेर काढलेल्या छोटया किराणा दुकानाला शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे लोळ दिसल्याने परिसरातील नागरिकांनी दार ठोठावून त्यांना ही माहिती दिली. तसेच अग्निशमन विभागाला फोनद्वारे कळवले. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या दोन अग्नीशमन बंबांनी २० मिनिटात आग आटोक्यात आणली. दरम्यान आगीत सुमारे ३० हजाराचे किराणा सामान जळून खाक झाल्याचे चौधरी यांनी सांगितले. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात आगीची नोंद करण्यात आली आहे.