जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२५
मावसबहिणीच्या लग्नासाठी मलकापूर येथे गेलेल्या श्रीनिवास नारायण मुंगड (वय ३६, रा. धनाजी काळे नगर) या टुरीस्ट व्यावसायीकाच्या घरात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास डल्ला मारला. त्यांच्या घरातून चोरट्यांनी साडेतीन तोळे सोने आणि सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांची रोकड असा ऐवज चोरुन नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्याने मुंगड यांच्या घरातून कपड्यांसह फरसाण व फळे देखील चोरुन नेले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील धनाजी काळे नगरात श्रीनिवास मुंगड हे आईसह वास्तव्यास असून त्यांचा टुरीस्टसाठी वाहने भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय आहे. रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मावस बहिणीचे लग्न असल्यामुळे त्यांची आई या काही दिवसांपुर्वी लगीन घरी गेल्या होत्या. तर श्रीनिवास हे शनिवारी लग्नासाठी घराला कुलूप लावून मलकापूर येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने श्रीनिवास यांच्या घराच्या कंपाऊंमधून उडी मारुन चोरट्याने मुंगड यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात ठेवलेले सोन्या दागिन्यांसह रोकड घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसल्याने चालक सोनार याने मालकाला फोन करुन तुम्ही घरी आहे का? अशी विचारणा केली. त्यावर मुंगड यांनी मी लग्नात असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी मुंगड यांनी तात्काळ आपल्या मित्राला कॉल करुन घराकडे जाण्यास सांगितले.
त्यांचा मित्र हा मुंगड यांच्या घरी गेला असता, त्याला घरातील सामान चोरट्यांनी अस्ताव्यस्त केल्याचे दिसून आले. मित्राने घरफोडी झाल्याचे सांगताच श्रीनिवास मुंगड हे लागलीच मलकापूर येथून दुचाकीने जळगावला येण्यासाठी निघाले. घरी आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती शहर पोलीसांना दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते.