जळगाव मिरर | २३ जानेवारी २०२५
भाच्याचा लग्न सोहळा आटोपून घरी जाण्यासाठी बसमध्ये चढत असलेल्या दीपिका अजयकुमार तिवारी (वय ३२, रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) या महिलेच्या पर्समधून ४० ग्रॅम वजनाचे ९५ हजार ६०० रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबवून नेले. ही घटना सोमवार दि. २० जानेवारी रोजी नवीन बसस्थानकात घडली. याप्रकरणी दि. २१ जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील रहिवासी दीपिका तिवारी या दि. १३ जानेवारी रोजी भावाच्या मुलाच्या लग्नासाठी जळगावला आल्या होत्या. लग्नसोहळा आटोपल्यानंतर दि. २० जानेवारी रोजी त्या सिल्लोड येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्या. फलाटावर लागलेल्या जळगाव-वैजापूर (एमएच ४० एन ९६६८) क्रमांकाच्या बसमध्ये चढत असताना मोठी गर्दी होती. दरम्यान, गर्दीतून माग काढत दीपीका तिवारी या बसमध्ये चढल्या. त्यांच्यासोबत असलेल्या नणंदेने दीपीका तिवारी यांना त्यांच्या पर्सची चैन उघडी असल्याचे सांगितले. त्या वेळी त्यांनी पर्समध्ये पाहिले असता त्यातून हॅण्ड पर्स दिसून आली नाही. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत दिपीका तिवारी यांच्या हॅण्ड पर्समध्ये असलेली तीन तोळ्याची सोनपोत, प्रत्येकी तीन ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, दोन भार वजनाच्या चांदीच्या पैंजन असा ९५ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
दिपीका तिवारी यांच्यासह त्यांच्या नणंदेने बसमध्ये तसेच स्थानक परिसरात हँड पर्सचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्या वेळी त्या शिवाजीनगरात भावाकडे निघून गेल्या. त्यांचे पती आल्यानंतर त्यांनी दि. २१ जानेवारी रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अलका शिंदे करीत आहेत.