जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२४
पहूर येथील जळगाव महामार्गावरील रेल्वे फाटकाजवळ १७ रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास टाटा कंपनीची कार डिव्हायडरला धडक देऊन रस्त्यावर उलटली. परंतु, कारमधील जखमी कोणत्यातरी वाहनाने निघून गेले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, पहूर येथे जळगाव महामार्गावर रेल्वे फाटक असून जळगावकडून पहूरकडे येणारी टाटा कंपनीची कार (एमएच ०१, डिबी १३६३) ही भरधाव वेगाने असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला जबर धडक देऊन रस्त्यावरच उलटली. या अपघाताची १०८ रुग्णवाहिकेला माहिती मिळाली. त्यानंतर १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली, तोपर्यंत या कारमधील जखमी कोणत्या तरी वाहनाने निघून गेले होते. यामुळे अपघातातील जखमींची माहिती मिळू शकली नाही.
पहुर येथील जळगाव रस्त्यावर असलेले रेल्वे फाटक अरुंद आहे. याच ठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. यामुळे हे ठिकाण अपघाती क्षेत्र ठरत आहे. वर्षभरात येथे १६ अपघात झाल्याची माहिती मिळाली असून यात अनेकांना येथे आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार होणारे अपघात लक्षात घेता महामार्ग अथॉरिटीने रेल्वे फटकाचा अरुंद रस्ता रुंद करुन तेथील रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून यानिमित्त केली जात आहे.