जळगाव मिरर | १२ मार्च २०२५
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतना आता अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव चारचाकीने तीन ते चार जणांना चिरडले आणि ही त्यानंतर ही गाडी रस्त्यालगतच्या दुकानात शिरली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य जखमी झाले.
सविस्तर वृत्त असे कि, नागपूर-मुंबई महामार्गावर एस.जे.एस. हॉस्पिटलजवळ मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला. सुनंदा साबळे (वय 57, रा. संवत्सर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या अलका साबळे (वय 58) यांच्यावर जवळच्या एस. जे. एस. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मोटारीचा चालक अमोल खांडगे (वय 35, रा. कोकमठाण) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो मद्यधुंद होता, असा नागरिकांचा आरोप आहे.
खांडगे चारचाकी वाहन घेऊन कोपरगावच्या दिशेने येत होते. चारचाकी इतकी वेगात होती की, नियंत्रण सुटल्यानंतर ती रस्त्यालगत असलेल्या एका जनरल स्टोअर दुकानात शिरली. त्यात तीन-चार जणांना धडक बसली. दुकानदाराचेही मोठे नुकसान झाले. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रित झाला असून, त्यात चारचाकी अत्यंत वेगाने येताना आणि अनियंत्रित होऊन दुकानात धडकतानाचे दृश्य दिसत आहे. त्या वेळी दुकानात व दुकानासमोर उभ्या असलेल्या नागरिकांची एकच पळापळ झाली. नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. प्राथमिक तपासात वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजते.