जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२५
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिसांनी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. १० आरोपींवर कारवाई करत शेती साहित्य, बॅटऱ्या, इन्व्हर्टर, मोटारसायकली व नॅनो कार जप्त करण्यात आली. सपोनि हरिदास बोचरे यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावदा, यावल, रावेर, मुक्ताईनगर परिसरात गेल्या काही दिवसांत वारंवार शेती उपयोगी साहित्य, तोलकाट्यावरील व बॅटरी-इन्व्हर्टर साहित्य मोटारसायकली चोरीस जाण्याच्या घटना घडत होत्या. वडगाव परिसरातील संशयित विलास ऊर्फ काल्या सुपडू वाघोदे याचा शोध घेतला असता तो पसार झाला. त्याच्या झोपडीतून योगिता सुनील कोळी हिच्यासह चोरीस गेलेले सोलर पॅनल व अन्य साहित्य पोलिसांच्या हाती लागले. चौकशीतून वाघोदे याने शिरसाळा येथील साथीदार व जमील तडवी यांच्या मदतीने निंभोरा येथील स्वप्नील वासुदेव चौधरी याला चोरीचा माल विकल्याचे उघड झाले. त्यानंतर चौधरीला ताब्यात घेऊन त्याच्या घर व गोडावून मधून मोठ्या प्रमाणात चोरीस गेलेला मुद्देमाल मिळून आला.
या कारवाईत एकूण १० आरोपींना ताब्यात घेतले आहे. विलास वाघोदे (फरार), योगिता कोळी, गोपाळ मोलनकर, आकाश चोटकर, अर्जुन सोळंकी (शिरसाळा), जमील तडवी (वडगाव), स्वप्नील चौधरी (निंभोरा), राकेश तडवी (सावदा) ललित पाटील (निंभोरा), राहुल ऊर्फ मयूर पाटील (वडगाव) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून १२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल – शेती साहित्य, एचटीपी. पंप, मशिन्स, ११ मोठ्या बॅटऱ्या, ५ इन्व्हर्टर, ५ मशिन्स, ४ मोटारसायकली, २ मिनी ट्रॅक्टर, नॅनो कार व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईमुळे निंभोरा पोलिस स्टेशनसह यावल, रावेर, सावदा, मुक्ताईनगर येथे दाखल असलेले एकूण १० गुन्हे उघडकीस आले. आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई दीपाली पाटील, ममता तडवी, सुरेश अढायगे, बिजू जावरे, रिजवान पिंजारी, अविनाश पाटोल, सुरेश पवार, किरण जाधव, रशिद तडवी, सरफराज तडवी, रफिक पटेल, अमोल वाघ, प्रभाकर हसाळ, प्रशांत चौधरी, महेंद्र महाजन, परेश सोनवणे, भूषण सपकाळे, सुभाष शिंदे, योगेश चौधरी, राहुल केदारे यांनी केली.