जळगाव मिरर | २१ जानेवारी २०२५
ऑनलाईन गेम खेळल्यास मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतात, असे अमिष दाखवत शासकीय ठेकेदार रोशन पदमसिंग पाटील (वय २७, रा. पाचोरा) यांना ७८ लाख ९० हजारात ऑनलाईन गंडविले. ही घटना दि. ३ नोव्हेंबर २०२४ ते दि. १२ जानेवारी रोजी दरम्यान घडली. याप्रकरणी फसवणुक करणाऱ्या दोघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील शासकीय ठेकेदार रोशन पाटील यांच्यासोबत दि. ३ नोव्हेंबरपासून दोन जणांनी व्हाटसअॅपवर संपर्क साधून एका वेबसाईटवरील ‘अंदर बाहर’ व ‘अंदर बाहर २’ हे गेम खेळल्यास मोठ्या प्रमाणात पैसे जिंकू शकतात, असे अमिष दाखविले. त्यानुसार शासकीय ठेकेदाराने ऑनलाईन गेम खेळण्यास सुरुवात केल्यानंतर त्यात ते जिंकल्याचे भासवून त्यांच्या बँक खात्यात सात लाख रुपये जमा केले. त्यातून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर त्यांना अधिक पैसे गुंतविण्याचे अमिष दाखवून सदर गेम खेळण्यास सांगितले. त्यानुसार ते वेळोवेळी हा ऑनलाईन गेम खेळत गेले. त्याच्या नावाखाली त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम उकळण्यास सुरुवात केली. तसेच नेटबँकिंगद्वारे त्यांच्याकडून एकूण ७८ लाख ९० हजार ५०० रुपये स्वीकारण्यात आले होते.
ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून पैसे मिळणे दूरच उलट गुंतविलेली रक्कमही गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संपर्क साधणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.