जळगाव मिरर | २५ जून २०२३
धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्र. चा. गावातील आशिष प्रकाश शिरसाळे (२२) या तरुणाचा गिरणा नदीपात्रात निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान घडली. या हत्येमुळे धरणगाव तालुका हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष हा रात्री जेवणानंतर शौचास बाहेर जातो, असे सांगून घराबाहेर पडला; परंतु खूप वेळ होऊनही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. गिरणा नदीपात्रात त्याचा क्रूर पद्धतीने खून झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी धरणगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक हृषीकेश रावले, एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील, पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी भेट दिली. या ठिकाणी श्वानपथक मागविण्यात आले होते. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.