जळगाव मिरर | १ फेब्रुवारी २०२६
नाशिराबाद येथील मुंजोबा मंदिर परिसरात भीषण अपघात झाला. एमएच २८ व्ही ६१५१ क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाला जीजे ३६ ३३४२ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने स्कॉर्पिओ रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात स्कॉर्पिओमधील पार्थ गावंडे (वय १७) हा अल्पवयीन मुलगा जखमी झाला आहे.
अपघातग्रस्त स्कॉर्पिओमधील कुटुंब हे तेल्हारा येथील असून ते देवदर्शनासाठी अमळनेर येथे जात होते. वाहनात लहान मुले व महिलाही असल्याने अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. मात्र सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली.
अपघातानंतर संबंधित ट्रकचालक ट्रक घटनास्थळीच सोडून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. अपघातानंतर स्कॉर्पिओमधील कुटुंब अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होते. नातेवाईक येईपर्यंत त्यांची कोणतीही सोय नसल्याने नशिराबाद येथील नगरसेवक प्रदीप बोढरे यांनी माणुसकीचे दर्शन घडवत या कुटुंबाला आपल्या निवासस्थानी तात्पुरता आश्रय दिला. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत अन्न, पाणी व अन्य आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या.
या संवेदनशील कृतीबद्दल परिसरातून नगरसेवक बोढरे यांचे कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. या प्रकरणी पुढील तपास व कार्यवाही नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहेत.



















