जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२४
चोपडा तालुक्यातील सातपुडा जंगल भागातील उमर्टी-कृष्णापूरमध्ये लासूर शिवारातील दुर्गम ठिकाणी बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दोघे आदिवासी तरुण रस्त्याने जात असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, हा बिबट्या होता की अन्य पशू, याचा तपास फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर कळेल, असे वनविभागाने म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल छगन पावरा (२२) व नितीन पावरा (२१) हे दोघे उमर्टी गावाकडून पायी चालत येत असता लासूरदरम्यान निर्मनुष्य जागेवर सकाळी ११ वाजता बिबट्याने अचानक मागून हल्ला केला. यात अनिल छगन पावरा याच्या डाव्या बाजूच्या गालावर, कानावर, हातावर या हल्ला करून त्याला जखमी केले. सोबत असणारा नितीन पावरा याने आरडाओरड करत त्याचा हल्ला परतवून लावला. त्यामुळे दोघांचाही जीव वाचला आहे. जखमी अनिल छगन पावरा यास दुपारी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. यासंदर्भात चोपडा ग्रामीण पोलिस रात्री उशिरापर्यंत नोंद घेत होते. हल्ला करणारा बिबट्या, वाघ की तरस, यासंदर्भात जखमीसह वनविभागाचे कर्मचारी यात साशंकता दिसून आली.