जळगाव मिरर | ५ डिसेंबर २०२५
कोल्हापूर–रत्नागिरी मार्गावर आंबा घाटात शुक्रवारी (दि.५) पहाटे मोठा अनर्थ टळला. नेपाळी बाग कामगारांना घेऊन रत्नागिरीकडे जात असलेली खासगी बस तब्बल ८० फूट खोल दरीत कोसळली. बस दरीतील दाट झाडीत अडकल्याने ११५ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. या दुर्घटनेत २४ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर रत्नागिरीत उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशहून नेपाळी बाग कामगारांना घेऊन निघालेली खासगी बस (एमपी-१३ पी-१३७) मध्यरात्री कोल्हापूरमार्गे रत्नागिरीला जात होती. बसची आसन क्षमता ६० असताना तब्बल ११५ प्रवासी भरल्याचे उघड झाले आहे. पहाटे पाचच्या सुमारास आंबा घाटातील चक्री वळण ओलांडत असताना चालकाच्या डोळ्यावर झापड आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले. वेग कमी न झाल्याने बसने संरक्षक कठडा तोडला आणि थेट ८० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत असल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र दाट झाडीमुळे बस झाडांमध्ये अडकल्याने ती आणखी खाली कोसळण्यापासून वाचली.
अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलिस आणि आंबा परिसरातील युवक तातडीने घटनास्थळी पोहोचले. भाई पाटील, दिनेश कांबळे, दिग्वीजय गुरव, दीपक भोसले आणि तुषार पाटील या तरुणांनी बचावकार्यात मोलाची मदत केली. जखमी प्रवाशांना बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी साखरपा रुग्णालयात दाखल करण्यात आले; त्यानंतर त्यांना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी घेतल्यामुळे बसमालकावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साखरपा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.




















