चाळीसगाव : कल्पेश महाले
वरखेडे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असलेल्या तामसवाडी गावाचा पुनर्वसन प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर याप्रश्नी आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत तामसवाडी गावासाठी मालेगाव रोड लगत पिलखोड गावाच्या अलीकडे जागा निश्चित करून दिल्याने मोठ्या प्रतिक्षेनंतर तामसवाडी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी तामसवाडी गावाचे मुख्य रस्त्यालगतच पुनर्वसन होणार असल्याने तामसवाडी ग्रामस्थांनी आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
सध्या पूर्णत्वास आलेल्या वरखेडे धरणाच्या बुडीत क्षेत्रात तामसवाडी गाव येत आहे. गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाच्या वतीने देण्यात येणारी शासकीय जमीन तामसवाडी ग्रामस्थांना मान्य नसल्याने त्यांनी गावासाठी पिलखोड व टाकळी प्रदे च्या मध्ये मालेगाव रोडलगत असणारी खाजगी जमीन संपादित करून द्यावी अशी मागणी केली होती, मात्र याला सबंधित शेती मालकांनी असहमती दर्शविल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. याबाबत मार्ग काढण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी आज दि.८ ऑगस्ट रोजी तामसवाडी येथील सरपंच, सदस्य, तामसवाडी पुनर्वसन समितीचे सदस्य व सबंधित शेतकऱ्यांसह महसूल, जलसंपदा, भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आपल्या जनसेवा कार्यालयात बोलावली होती. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी गजेंद्र पाटोळे, वरखेडे लोंढे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस आर भोसले, प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, उपअभियंता कामेश पाटील, तालुका भूमि अभिलेख, कार्यालयाचे देवेंद्र राजपूत, भाजपा तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, तामसवाडी सरपंच शिवदास धोंडू पाटील, उपसरपंच अनिता नाना दळवी, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र विश्वास पाटील, ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, ग्रामपंचायत सदस्य विठोबा पाटील, वरखडे लोंढे बॅरेज तामसवाडी पुनर्वसन अध्यक्ष सचिन पाटील व तामसवाडी गावाचे पोलीस पाटील किरण दळवी, धनराज पाटील, कारभारी सोनवणे, अशोक सोनवणे आदी उपस्थित होते.
सदर बैठकीत दोन्ही बाजूंकडून सहमती न झाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत सध्या नाशिक येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले पिलखोड गावाचे सुपुत्र अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधून याच जागेच्या बाजूला असलेली त्यांची शेतजमीन तामसवाडी गावासाठी देण्याची विनंती केली. एका पूर्ण गावाचा पुनर्वसन प्रश्न मार्गी लागत असल्याने व त्यासाठी आमदार मंगेश चव्हाण हे विनंती करत असल्याने अनिल पाटील यांनीदेखील आपला होकार कळविला. योगायोगाने तेदेखील गावी आले असल्याने त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना अधिकारी व शेतकरी यांच्यासह मागणी असलेली शेतजमीन पाहणीसाठी येण्याची विनंती केली.
आमदार मंगेश चव्हाण यांची अधिकारी वर्ग व तामसवाडी ग्रामस्थांसह जागेची पाहणी, नवीन जागा सर्वाना मान्य…
चाळीसगाव मालेगाव रोडलगत टाकळी प्रदे गावाच्या पुढे मन्याड ५ नंबर चारी जवळ असलेले पीआय अनिल पाटील यांच्या शेताच्या पाहणीसाठी आमदार मंगेश चव्हाण तात्काळ अधिकारी वर्ग व तामसवाडी ग्रामस्थ यांच्यासोबत दाखल झाले. याठिकाणी अनिल पाटील यांची २७ एकर जमीन आहे. सदर जागेची सामुहिक पाहणी केल्यानंतर ही जागा गावाच्या पुनर्वसनासाठी योग्य असल्याचे सर्वांनी आपले मत व्यक्त केले, अतिशय मोठ्या मनाने आपल्या पिलखोड गावाजवळील तामसवाडी गावाला जागा देण्याचा मोठेपणा दाखविल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी अनिल पाटील यांचे आभार मानले.
“दादा हाऊ विषय तुम्हीच मार्गी लावश्यात हाई आमले माहिती होत” तामसवाडी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया
प्राथमिक दृष्ट्या गावाच्या पुनर्वसनासाठी जागेची सहमती झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी लगेच तामसवाडी गावात जाऊन सर्व गावकऱ्यांची सभा घेत त्यांचीदेखील सदर जागेविषयीची मते जाणून घेतली. यावेळी सर्व तामसवाडी ग्रामस्थांनी देखील सदर जागेला सहमती दर्शवली. गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे मार्गी लागत असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. “दादा आमना गावना विषय तुम्हीच मार्गी लावश्यात हाई आमले माहिती होत” अश्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया यावेळी तामसवाडी ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या.
महाविकास आघाडी सरकारने खोडाघातलेले वरखेडे बंदिस्त पाईप कालवा प्रकल्पाचे काम देखील लवकरच सुरु होणार – आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास
पिलखोड गावाचे सुपुत्र अनिल पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखविल्याने आज तामसवाडी गावाच्या पुनर्वसन विषयाला दिशा मिळाली आहे. पुढील काळात यातील तांत्रिक बाबी तपासून लवकरात लवकर हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न मी वैयक्तिक लक्ष घालून करणार आहे. तश्या सूचना सबंधित अधिकारी यांना दिल्या असून राज्यात मॉडेल ठरेल असे हे पुनर्वसन करण्याचा माझा प्रयत्न राहील. तामसवाडी गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर वरखेडे धरणाचे पाणी १०० टक्के अडविले जाणार असून यासोबतच महाविकास आघाडी काळात बंदिस्त पाईपलाईन प्रस्ताव तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाकारल्याने सदर प्रकल्प रखडला होता. भाजपा महायुतीचे सरकार आल्यानंतर त्याला पुन्हा मान्यता मिळवून आणली असून त्याचा आराखडा देखील मंजूर झाला आहे. लवकरच यासाठी देखील निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. १९९९ सालापासून चे वरखेडे धरणाच्या पाण्याचे तालुकावासीयांचे स्वप्न साकार होईल हा मला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.