जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२५
पाचोरा शहरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्यावर संशय घेत पती मारहाण करत असल्याने वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळून अखेर विवाहितेने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना पाचोरा शहरात घडली आहे. विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मयत विवाहितेच्या पती विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गणपती नगर, पुनगाव रोड, पाचोरा येथील रहिवाशी माधुरी हिने सन २०२३ मध्ये विशाल सोनवणे याचेशी प्रेम विवाह केला होता. मात्र विशाल हा माधुरीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करीत होता अखेर वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून माधुरी हिने ३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास नंदनवन सिटी, पाचोरा येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. घटनेप्रकरणी मयत माधुरी हिचे वडिल धनराज मिस्तरी यांच्या फिर्यादीवरून विशाल सोनवणे याचे विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलिस करीत आहेत.
