
जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२३
राज्यात अनेक तरुण तरुणी प्रेमप्रकरणाच्या माध्यमातून आपली जीवनयात्रा संपविल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून आज पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका गावातून एक प्रेमीयुगुल गेल्या दीड महिन्यापूर्वी आपले घर सोडून कसारा येथील एका खोलीत तरुण व तरुणीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हि घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवाशी असलेले सोमनाथ सोनवणे (वय २३ वर्ष) आणि सुजाता देशमुख (वय २१ वर्ष) या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने दीड महिन्यांपूर्वी दोघेही घर सोडून कसारा येथील तानाजीनगर परिसरात आले होते. दि. १२ सप्टेंबर रोजी सोमनाथ आणि सुजाताने ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घरमालकाला दोघांचेही मृतदेह एकमेकांच्या बाजूला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती कसारा पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. बी. तडवी, उपनिरीक्षक एस.बी. जाधव पथकासह दाखल झाले. पोलिसांनी दोघांच्याही कुटुंबियांना फोनवरुन संपर्क साधत घटनेची माहिती दिली. दोघांचेही मृतदेह अकोले येथे नेल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणतीही चिठ्ठी लिहीली नसल्याने कारण कळू शकले नाही.




















