
जळगाव मिरर / १० ऑक्टोबर २०२२
मैढ क्षत्रिय सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत परमपिता अजमिढजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी ९ ऑक्टोबर रोजी शहरातून सकाळी भाविकांच्या उत्साहामध्ये शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत डोक्यावर कलश घेतलेल्या महिला आणि महाराजांची जिवंत वेशभूषा लक्ष वेधून घेत होती. परमपिता परमात्मा अजमिढजी महाराज यांची रविवारी ९ ऑक्टोबर रोजी जयंती महोत्सव निमित्त मैढ क्षत्रिय सुवर्णकार समाजातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सराफ बाजार येथून भाविकांच्या उत्साहात शोभायात्रेला प्रारंभ झाला. महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेतले होते. तर मुलांसह पुरुष सहभागी झाले होते. अजमिढजी महाराज यांच्या वेशभूषेत महावीर वर्मा, महाराजांचे पुत्र द्विमीढजी यांच्या वेशभूषेत पंकज ढल्ला यांनी तसेच दुसरे सुपुत्र पिरुमीढ यांच्या वेशभूषेत वंश वर्मा यांनी लक्ष वेधून घेतला.
यावेळी मंगल वाद्यांच्या गजरात अजमिढजी महाराज यांच्या पावन चरित्राविषयी माहिती सांगितली जात होती. तसेच भजन सादर होत होती. शोभायात्रा सराफ बाजार, सुभाष चौक, दाणा बाजार, गोलाणी मार्केट, हनुमान मंदिर मार्गे नवजीवन मंगल कार्यालय अशा मार्गाने समाप्त झाली. या ठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. दिवसभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सादर झाले.
कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी उपस्थिती होती. त्यांनी महापुरुषांचे चरित्र जीवनात अंगिकारावे असे सांगितले. महिला मंडळाद्वारे नेत्रदान विषयावर जनजागृती करण्यासाठी प्रभावी नाटक सादर करण्यात आले. यानंतर लहान मुलांनी फॅन्सी ड्रेस मध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमात रंगत आणली. तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये २१ समाज बांधवांनी रक्तदान केले. परमपिता अजमिढजी महाराज जयंती महोत्सवासाठी मैढ क्षत्रिय समाज अध्यक्ष ऍड. के. बी. वर्मा, जिल्हाध्यक्ष पन्नालाल वर्मा, महिला मंडळाच्या अध्यक्षा विद्या वर्मा यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधवांनी परिश्रम घेतले.




















