जळगाव मिरर | २८ जानेवारी २०२४
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना नाशिक शहरातून एका धावत्या बसला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेल्या एका धावत्या बसने अचानक पेट घेतला. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास नाशिकच्या नांदगाव-मालेगाव रोडवर रामवाडी शिवारात इंदैरहून पुण्याला जाणा-या खाजगी ट्रॅव्हल्स गाडीचा पाठी मागील टायर अचानक फुटला. धावत्या बसचा टायर फुटल्यानंतर बसने तेथेच पेट घेतला.
यावेळी वाहनचालकाने वेळीच बस थांबवत बसमध्ये असलेल्या ४० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र बसने पेट घेतला असल्याने बसमधील जे पार्सल होते ते बस सह जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव येथून अग्निशामक घटनास्थळी पोहचले. मात्र अग्निशामकदल घटनास्थळी पोहचेपर्यंत बस जळून पूर्णता खाक झाली होती. सुदैवाने यात कुणालाही काही ईजा झाली नसली तरी बसमधील प्रवाशांच्या सामानाचे आणि बसचे मोठे नुकसान झाले आहे.