जळगाव मिरर | ४ मार्च २०२५
बांधकाम झालेल्या इमारतीच्या गच्चीवर मित्रांसोबत दारुची पार्टी झाली. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत त्याचा गच्चीवरुन पाय घसरुन तोल जावून खाली कोसळला. यामध्ये मनोहर ढेमा बारेला (वय ३०) या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास चंदू आण्णा नगरात घडली. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी त्याला कोणीतरी धक्कामारुन खाली ढकलून दिल्याचा आरोप केला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मध्यप्रदेशातील मनोहर बारेला हे गेल्या दीड वर्षांपासून शहरातील चंदू आण्णा नगरात नरेंद्र साळुंखे यांच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. याच परिसरातील एका ठिकाणी झोपडीत मनोहर बारेलासह पत्नी व मुलं असा परिवार होता. रविवारी रात्री ते आपल्या काही मित्रांसोबत पार्टी करीत होते. पार्टी करीत असतांना त्यांनी अतिरीक्त प्रमाणात दारु रिचवली. मद्यधुंद अवस्थेत असतांना त्यांचा दुसऱ्या मजल्यावरील गच्चीवरुन त्यांचा तोल जावून ते खाली कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना लागलीच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषीत केल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.
गच्चीवरुन तोल गेल्यामुळे मनोहर बारेला हे थेट खाली कोसळले. यावेळी खालच्या बाजूला वाळू व इतर बांधकाम साहित्य देखील होते. तर बांधकामाच्या ठिकाणी वॉल कंपाऊंडची भिंत देखील तयार करण्यात आली होती. मनोहर हे दुसऱ्या मजल्यावरुन थेट वॉलकं पाऊंडच्या भितीवर आदळले. त्यामुळे त्यांचा डोक्याला जबर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गच्चीवरुन पडल्याने मनोहर बारेला याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याठिकाणी बारेला हे काही जणांसोबत पार्टी करीत असल्याची चर्चा परिसरात सुरु होती. दरम्यान, पोलिसांनी फॉरेन्सीकचे पथक पुरावे गोळा करण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले.
