
जळगाव मिरर | १७ मार्च २०२६
अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथे शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला आग लागून उभे पीक आणि ठिबक सिंचनाच्या नळ्या जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आग अधिक पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे येथील शेतकरी भीमराव नारायण पाटील यांच्या शेतात रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविण्यात आलेले आहे. या रोहित्रामध्ये अचानक पक्षी शिरल्याने शॉर्टसर्किट झाले. त्यातून उडालेली ठिणगी शेतातील उभ्या गव्हाच्या पिकावर पडली आणि काही क्षणांतच गव्हाच्या शेताला आग लागली. सुरुवातीला छोट्या प्रमाणात लागलेली आग वाऱ्यामुळे झपाट्याने संपूर्ण शेतात पसरली.
दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ पालिकेला कळवून अग्निशमन दलाला बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालिकेकडून आधी पोलिसांत तक्रार करण्याचे सांगण्यात आले. तोपर्यंत आगीची तीव्रता वाढत गेली.
गावातील श्याम पाटील, भीमराव पाटील, सुनील पाटील, नारायण पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील आणि प्रकाश पाटील यांच्यासह अनेक शेतकरी व तरुणांनी धाव घेतली. त्यांनी आजूबाजूच्या शेतातील ओल्या मक्याच्या व बाजरीच्या तोट्यांचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे काही वेळानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
दरम्यान, दिनेश पाटील यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना घटनेची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर शेतातील उष्णता आणि उरलेल्या ठिणग्या पूर्णपणे विझवण्यासाठी अग्निशमन दलाने शेतावर पाण्याचा मारा करून संपूर्ण क्षेत्र ओले केले. त्यामुळे पुढील धोका टळला.
या घटनेत गव्हाचे उभे पीक तसेच ठिबक सिंचनाच्या नळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे. कॉ. काशिनाथ पाटील करत आहेत.
गरमीच्या दिवसांत शेतांजवळील वीज यंत्रणेमुळे आगीचा धोका वाढत असल्याने संबंधित यंत्रणेची वेळोवेळी तपासणी करण्याची गरज असल्याचेही ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.




















