
जळगाव मिरर | २० मार्च २०२६
पाचोरा शहरातील बायपास रोडवर भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात दुभाजक व विजेच्या खांबाला धडक देत उलटल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असून ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगावकडून पहुरकडे जाणारी ट्रक (एमएच-१९, सीएक्स-४६९९) दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास पाचोरा बायपासवरून जात होती. यावेळी विकास कॉलनीकडून अचानक एक दुचाकीस्वार रस्त्यावर आला. त्याला वाचवण्यासाठी ट्रक चालकाने वळण घेतले, मात्र ट्रक वेगात असल्याने नियंत्रण सुटले. ट्रकने प्रथम दुभाजक व विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. त्यानंतर ट्रक विरुद्ध दिशेला जाऊन उलटली. अपघातावेळी समोरून येणाऱ्या दोन दुचाकींवरील चार जण थोडक्यात बचावले.
या अपघातात ट्रक चालक राजू पाटील जखमी झाला असून पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला बाहेर काढून मदत केली. ट्रकमध्ये ऑईल भरलेले असल्याने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती, मात्र सुदैवाने अनर्थ टळला. अपघातात रस्त्यावरील विजेचा खांब पूर्णपणे कोसळला असून नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, शहरातील बायपासवर जड वाहनांनी सावधगिरीने व कमी वेगात वाहन चालवावे, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.




















