जळगाव मिरर | २३ जुलै २०२५
शहरातील श्री स्वामी समर्थ चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी लावून धरली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन उपायुक्त धनश्री शिंदे यांना नागरिकांनी बुधवार दि. २३जुलै रोजी दुपारी दिले.
रामेश्वर कॉलनीतील सर्वात मोठा चौक असलेल्या स्वामी समर्थ चौकात, जिथे अशोक किराणा ते जकात सोसायटी आणि श्रीकृष्ण मेडिकल ते मंगलपुरी रस्ता या दरम्यानच्या भागात हा पुतळा उभारण्याची मागणी नागरिकांनी एका विनंती अर्जाद्वारे केली आहे. नागरिकांनी आपल्या मागणीत म्हटले आहे की, या परिसरात सर्व जाती-धर्माचे नागरिक एकत्र राहतात. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे आदर्श विचार, महिलांविषयीची त्यांची उच्च विचारसरणी, तसेच त्यांचे अनेक गुण आजही प्रेरणादायी आहेत.
त्यामुळे त्यांचा पुतळा या परिसरात उभारल्यास तो आदर्श आणि महान व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव कायम बिंबवेल. या पुतळ्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, असेही नागरिकांनी स्पष्ट केले आहे. उलट, ‘सुंदर जळगाव’ या संकल्पनेत यामुळे भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे स्वामी समर्थ चौकात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास तातडीने परवानगी द्यावी, अशी नम्र विनंती परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते विशाल देशमुख, डी. आर. पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप मांडोळे, गणेश पाटील, अविनाश पाटील, हर्षल वाणी, महेश माळी, शिवम बामणे, प्रदीप पाटील आदि नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
