जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२५
कामानिमित्त जळगावात आलेल्या परप्रांतीय तरुणाने कामाच्याच ठिकाणी ओळखीचा गैरफायदा घेत १५ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार सहा महिन्यांपासून निमखेडी शिवारात सुरू होता. या विषयी कोणाला काही सांगितल्यास मुलीला जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या प्रकरणी अत्याचार करणारा मुकेश साकेत (रा. दमोय, जि. उमरिया, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तरुण पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
सविस्तर वृत्त असे की , शहरातील निमखेडी शिवारात परप्रांतीय काही कुटुंब कामानिमित्त आलेले आहेत. त्यात मध्यप्रदेशातील मुकेश साकेत हा तरुणदेखील कामासाठी येथे आला. या ठिकाणी त्याची पीडित मुलीच्या कुटुंबाशी ओळख झाल्याने त्याचे त्यांच्या घरी नेहमी येणे जाणे सुरू होते. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने सदर कुटुंबातील १५ वर्षीय मुलीवर सहा महिन्यांपूर्वी अत्याचार केला. त्यानंतरही तो नेहमी घरी जाऊन मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार करायचा. हा प्रकार असह्य झाल्याने मुलीने याविषयी घरी सांगितले. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्यात दि. १९ डिसेंबर रोजी फिर्याद दिली. त्यावरून अत्याचार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक अनंत अहिरे करीत आहेत.
मुलीवर अत्याचार केल्यानंतर हा प्रकार वडिलांना सांगितल्यास मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी तरुणाने दिली. तसेच गुन्हा केल्यापासून तो पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.





















