
जळगाव मिरर | २४ मे २०२५
जामनेर तालुक्यातील पहूर येथे उमलत्या फुलासारख्या तेजस्विनी सुभाष भिवसने या नुकत्याच दहावीची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थिनीने आयुष्याची भरारी घेण्याआधीच या जगाचा निरोप घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पहूर कसबे येथील लेले नगरमधील रहिवासी व महात्मा फुले शिक्षण संस्थेची माजी विद्यार्थिनी असलेली तेजस्विनी (वय १६) चा २३ मे रोजी दुपारी ४ वाजता अल्पशा आजाराने जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, तेजस्विनी नुकतीच आर. टी. लेले हायस्कूलमधून दहावीची परीक्षा ५७.४०% गुणांसह उत्तीर्ण झाली होती. तर १५ दिवसांपूर्वी अचानक प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तिला न्यूमोनिया आणि मधुमेहाचा त्रास जाणवू लागला. त्यानंततर तिला तत्काळ आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र, सर्व प्रयत्न ांना अपयश आले अन् शुक्रवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, तेजस्विनीवर सायंकाळी ८.३० वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे, पारंपरिक रीतिरिवाजानुसार तिच्या अंत्यविधीपूर्वी लग्नविधी पार पाडण्यात आला. या वेळी पुरोहितांच्या मंगलाष्टकांनी सारे वातावरण भावूक झाले होते. तर उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले होते. मृत तेजस्वीनीच्या पश्चात आई-वडील, भाऊ, ३ बहिणी असा परिवार आहे. तिच्या वडिलांची परिस्थिती हलाखीची असून मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर तेजस्वीनी शिक्षणात प्रगती करणारी, शांत, सुस्वभावी आणि अभ्यासू मुलगी होती. तिच्या अकाली निधनाने लेले नगरसह शिक्षक, विद्यार्थ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.



















