जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२५
शहरातील प्रतापनगर येथे असलेल्या फर्निचरच्या दुकानाला शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता अचानक भीषण आग लागली. या आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील प्रतापनगर येथील मंगेश गुजराती यांच्या मालकीचे फर्निचरचे दुकान बंद असताना ही आग लागली. अचानक उठलेल्या आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने ही माहिती अग्निशमन विभागाला दिली. ाहानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले. आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वाहनचालक देविदास सुरवाडे, संतोष तायडे, रोहिदास चौधरी आणि भगवान पाटील या कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेत आग आटोक्यात आणली. त्यांच्या वेगवान प्रतिसादामुळे आगीचा विस्तार रोखला गेला आणि मोठी दुर्घटना टळली.
या आगीत फर्निचरचे मोठे नुकसान झाले असून, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानातील लाकडी फर्निचर आणि इतर ज्वलनशील साहित्यामुळे आगीने वेगाने पेट घेतला आणि संपूर्ण दुकान जळून खाक झाले.