जळगाव मिरर | २३ जानेवारी २०२५
शहरातील मास्टर कॉलनीत असलेल्या टेन्ट हाऊच्या गोडावूनला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या आगीत टेन्ट हाऊसमधील मंडपाचे साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, महापालिकेच्या दोन अग्शिनमन विभागाच्या बंबानी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज नागरिकांकडून वर्तविला जात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील इकबाल कॉलनीत राहणारे अनिस शफी पिंजारी यांचे मास्टर कॉलनीत आरमान टेन्ट हाऊस आहे. एका हाताने अपंग असलेले अनिस पिंजारी हे टेन्ट हाऊस चालवून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. बुधवार दि. २२ जानेवारी रोजी पिंजारी हे जेवणासाठी घरी गेलेले असतांना, अचानक त्यांच्या टेन्ट हाऊसच्या गोडावूनला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण करीत गोडावूनमधील टेन्टचे साहित्य आगीच्या विळख्यात येवून ते पुर्णपणे जळून खाक झाले. गोडावूनमधून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती पिंजारी यांना दिली. त्यानुसार पिंजारी हे लागलीच गोडावूनजवळ आले असता, त्यांना गोडावूनमधील साहित्य जळत असल्याचे दिसून आले.
टेन्ट हाऊसच्या गोडावूनला आग लागल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागला मिळताच, दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी देखील पथकाला मदत कार्य करीत गोडावूनमध्ये जळत असलेले पडदे आणि इतर साहित्य बाहेर काढून आग विझविण्यास मदत केली.
या आगीत कापडी मंडप, डेकोरेशनचे साहित्य, खुर्चा, टेबल, पातेले, पडदे, मॅटीन यासह टेन्ट हाऊसमधील साहित्य जळून खाक झाले. या घटनेमध्ये पिंजारी यांचे सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांच्या पुतण्याने दिली.सद्या लग्नसराई सुरु असून आनिस पिंजारी यांनी लग्नाची कामे घेतलेली आहे. ऐन लग्नसराईच्या काळात त्यांच्या गोडावूनला आग लागून मंडपाचे साहित्य जळून खाक झाल्यामुळे त्यांना मोठा आर्थिकनुकसान सहन करावे लागणार आहे.