
जळगाव मिरर | ७ मे २०२५
विवाहीत प्रेमीयुगुलाची चार वर्षीय मुलाला सोबत घेवून त्यांनी धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. ही घटना दि. ५ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान घडली. यात मयत झालेल्या राजेंद्र निंबा मोरे (वय २३, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा), राधिका उर्फ टोनी लहू ठाकरे (वय २५, रा. बारामती, जि. पुणे) व तिचा वार वर्षाचा मुलगा सारंग लहू ठाकरे यांचा समावेश असून पोलिसांनी त्यांची ओळख पटवली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान खांबा क्रमांक ३७६/ १९ जवळ एका महिला व पुरुषासह अडीच वर्षीय बालक हे रेल्वे रुळावरुन चालत येत होते. हा प्रकार मनमाड कडुन भुसावळकडे जाणाऱ्या अयोध्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या लोकोपायलटच्या लक्षात आला. मात्र अचानक ते समोर आल्यामुळे त्या तिघांना एक्सप्रेसने चिरडले. याबाबतची माहिती लोकोपायलट डी. एफ. डिसुझा यांनी पाचोरा रेल्वे स्टेशन मास्तर यांना दिली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, उपनिरीक्षक योगेश गणगे, पोह-कॉ राहुल शिंपी, अशोक हटकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांना रेल्वे रुळावर महिला, पुरुषासह अडीच वर्षीय मुलगा असे तिघांचे छिन्नविछिन्न मृतदेह पडलेले होते. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह तात्काळ रुग्णवाहिका चालक किशोर लोहार याच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला पोलिसांनी सोशल मीडियावर फोटा व्हायरल करुन राजेंद्र मोरे या तरुणाची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेह पडलेल्या ठिकाणी सापडलेल्या मोबाईलवर असलेल्या इन्सटाग्राम चॅटींगवरुन राधीका ठाकरे या महिलेच्या भावाला स्क्रिन शॉर्ट टाकले. त्याने मयत आपली बहिण असल्याचे सांगितल्यानंतर राधीका ठाकरेसह तिच्या चार वर्षीय मुलगा सारंग याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.
विवाहीत राजेंद्र मोरे याच्याकडे बारामती येथून त्याची विवाहित प्रेयसी राहण्यासाठी आली होती. त्यामुळे मोरे यांच्या घरात कौटुंबिक वाद सुरु होता. याच वादातून विवाहित प्रेमीयुगुलाने चार वर्षीय सारंग ठाकरे या बालाकाला सोबत घेत आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.