जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२३
जळगाव शहरातील एका वकिलाला एका समाजाविषयी आक्षेपार्ह विधान करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणे भोवले आहे. त्यामुळे शहरातील बळीराम पेठेतील रहिवासी अॅड. केदार भुसारी यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दूध फेडरेशन परिसरातील भारत नगरात पवन रमेश घुसर यांना व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ५ ऑगस्ट रोजी जातीवाचक भाषेत तयार केलेला व्हिडीओ दिसून आला होता. यामध्ये समाजाची बदनामी होत असल्याने त्यांनी या व्हिडीओबद्दल संपूर्ण माहिती काढली असता तो व्हिडीओ बळीराम पेठेतील अॅड. केदार भुसारी यांनी तयार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. समाजाची बदनामीकरणारा व्हिडीओ देवून पवन घुसर यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार भुसारी यांच्याविरुद्ध अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित हे करीत आहेत.
