जळगाव मिरर | १३ मार्च २०२५
पॅन कार्ड रद्द करण्यासाठी आयकर विभागातील अधिकाऱ्याने एका महिला डॉक्टरकडे लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर केंद्राच्या पुणे सीबीआय व एसीबीच्या पथकाने आयकर विभागातील अधिकारी राकेश रंजन उमेश झा (वय ३५, रा. महाबळ) व शिपाई ज्ञानेश्वर सोनवणे (वय ३८, रा. हरेकृष्ण रेसीडन्सी पाचोरा) यांना पाच हजारांची लाच घेतांना पुणे सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास बी. जे. मार्केटमधील आयकर विभागाच्या कार्यालयात झाली. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ माजून गेली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जिल्ह्यातील एका तालुक्यातील महिला डॉक्टर असून त्यांचे २०१८ मध्ये पॅनकार्ड हरविले होते. त्या पॅन कार्डची कॉपी मिळविण्यासाठी त्या महिला डॉक्टरने अर्ज केला होता. परंतु त्यांना नवीन पॅनकार्ड देण्यात आले होते, मात्र ते पॅन कार्डचा त्यांनी कधीच वापर केला नव्हता. दरम्यान, २०१८ ते २०२१ पर्यंत त्यांना आयकर भरला जात नव्हता. त्यावेळी त्यांना समजले की त्यांना वेगवेगळ्या क्रमांकाचे पॅनकार्ड मिळाल्यामुळे होत असल्याचे त्यांच्या सीएच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्या महिला डॉक्टरांनी लागलीच ऑनलाईन अर्ज करुन ते पॅनकार्ड रद्द करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते रद्द झाले नाही. त्यामुळे डॉक्टर त्यांचे प्रशासकीय अधिकारी यांना घेवून आयकर ऑफिसला जावून त्यांनी पाठपुरावा केला.
त्या महिला डॉक्टर दि. १० मार्च रोजी आयकर विभागाच्या कार्यालयात गेल्या असता, त्यांना आयकर अधिकारी राकेश रंजन यांनी पॅन कार्ड रद्द करण्यासाठी सुरुवातीला दहा हजारांच्या लाचेची मागणी केली. मात्र वाटाघाटीनंतर ती रक्कम पाच हजारांवर आणली महीला डॉक्टरांच्या प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून ज्ञानेश्वर सोनवणे या शिपायाने आयकर अधिकाऱ्याच्या सांगण्यावरुन लाच स्विकारतांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन सीबीआयच्या पथकाने आयकर अधिकारी राकेश रंजन व ज्ञानेश्वर सोनवणे या दोघांना अटक केली. त्यांना न्या. राजूरकर यांच्या न्यायालयात हजर केले. राकेश रंजन यांना दि. १५ पर्यंत पोलीस कोठडी तर ज्ञानेश्वर सोनवणे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
याबाबतची तक्रार महिला डॉक्टरने पुणे येथील सीबीआयकडे केली. दरम्यान, सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. आयकर अधिकाऱ्याच्या संपूर्ण संभाषणाची नोंद डिजिटल रेकॉर्डरमध्ये करण्यात आली आहे. तसेच रक्कम एका सहकाऱ्याला देण्याचे त्यांनी सांगितले होते. या सर्वबाबींची पडताळणी केल्यानंतर सीबीआयच्या पथकाने सापळा रचला होता.