जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२४
शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये व्यापाऱ्याच्या पत्नीचा डोक्यात हातोड्याने वार करून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघड झाली होती. दरम्यान, उसनवारी दिलेले पैसे संशयित आरोपींकडे मयत महिलेने वारंवार मागून तगादा लावला म्हणून एका महिलेसह तिघांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि एलसीबीचे पथक यांनी २० तासात याचा उलगडा करून तिघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा राजेश नवाल (वय ५७, रा. रणछोड नगर, गणेश वाडी जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती राजेश नवाल हे दाणा बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी आहेत. दरम्यान गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवाल ह्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरु केला.
मयत सुवर्णा नवाल यांच्या घरी संशयित सरलाबाई हि काम करायला २०१६ सालापासून येत होती. तेव्हापासून त्यांचे ओळखी होती. यातून सुवर्णा यांनी सरलाबाई हिला उसनवारी ३ लाख रुपये दिले होते. मात्र सरलाबाईने ते परत केले नाही. तसेच दुसरा संशयित लाला पासवान यालाहि ५० हजार रुपये मयत सुवर्णा यांनी दिले होते. तर लाला हिच्या पत्नीला काही दागिने दिले होते. ते तिने एका सराफाकडे गहाण ठेऊन त्याबदल्यात पैसे काढले होते. आता सुवर्णा नवाल या दोघांकडे पैसे परत मिळावे म्हणून तगादा लावत होत्या. त्यात दोघे टाळाटाळ करीत होते. त्यातच सरलाबाई हिच्या ओळखीचा तिसरा संशयित राजेंद्र उर्फ आप्पा याने अजून पैसे उधार मिळावे म्हणून सुवर्णा हिच्याकडे पैशांची मागणी केली होती. ते होती. ते देण्यास सुवर्णा नवाल यांनी नकार दिला होता.
दरम्यान, दि. १० रोजी सुवर्णा यांनी दिवसभरात लाला याला फोन करून उसनवारी दिलेले पैसे परत मागितले. सततच्या तगाद्याला कंटाळून अखेर लाला पासवान, सरलाबाई आणि राजेंद्र यांनी काल गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता रणछोड नगरातील सुवर्णा नवाल यांचे घर गाठले. तेथे पैसे परत मागण्यावरून महिलेशी तिघांचे वाद झाले. त्यातून लाला पासवान याने सुवर्णा यांच्या डोक्यात हातोड्याचे २ जबर वार करून त्यांना संपविले. तेथून तिघे पसार झाले. दरम्यान, पोलिसांनी ‘कॉल डिटेल्स’ काढून तिघांचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील हातोडा देखील जप्त करण्यात आला आहे.
एलसीबीने मयत सुवर्णा नवाल यांचे मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स तपासले. त्यात एका नंबरवर दिवसात सारखे ४ ते ५ वेळा फोन आल्याचे दिसले. त्या दृष्टीने तपासले असता पोलीस संशयित आरोपी लालबाबू उर्फ लाला रामनाथ पासवान (वय ४३, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्यापर्यंत पोहोचले. तसेच, तपासानुसार आणखी दोघे सरलाबाई धर्मेंद्र चव्हाण (वय ४२, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), राजेंद्र उर्फ आप्पा रामनाथ पाटील (वय ५८, रा. म्हसावद ता. जळगाव) यांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर तिघांना पोलिसी खाक्या दाखविताच तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. यामागील घटनाक्रम ऐकून पोलिसही काहि काळ स्तब्ध झाले.