
जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२३
राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोलनाक्याजवळ शनिवारी पहाटेच्या सुमारास पतीवर उपचार सुरु असल्याने नाशिक येथून उपचार घेवून परतणाऱ्यांची कार खांबावर धडकली. या अपघातात कारमधील सावित्री सुनिल हसकर (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये कारमधील अन्य तीघे जण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरातील सुनिल हसकर हे पोलिस भरतीचे प्रशिक्षक आहे. ते आजारी असल्याने त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहे. उपचारासाठी त्यांना अधून मधून नाशिक येथे जावे लागत असल्याने ते नाशिक येथे गेले होते. उपचार घेवून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कारने ते रावेरला येण्यासाठी निघाले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सावित्री हसकर, अन्य एक महिला व मित्र होते. पहाटेच्या सुमारास जळगाव पार केल्यानंतर हसकर यांची कार नशिराबाद टोलनाक्याजवळ पोहचली. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट समोर असलेल्या खांबावर जावून आदळली.भरधाव वेगाने असलेली कार खांबावर आदळल्यामुळे कारमध्ये बसलेल्या सावित्री हसकर या गंभीर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच चालकाचा हात व पाय फॅक्चर झाला आहे तर अन्य दोघांनाही मार लागला आहे. मयत महिलेच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच नाशिराबाद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मयतासह जखमींना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सावित्री हसकर यांची तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले. तर अन्य तिघांवर उपचार सुरु आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.