जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२४
अमळनेर शहरातील विप्रो पुल ते बोरी नदी पुलाच्या दरम्यान धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने तांबेपुरा येथील २४ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निखिल श्याम पाटील वय २४ रा. तांबेपुरा अमळनेर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात निखिल पाटील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. निखिल पाटील हा सुरत येथून अमळनेर येथे येण्यासाठी सुरत भूसावळ पॅसेंजरने येण्यासाठी गुरूवारी ४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता रेल्वेत सुरत येथून बसला होता. शुक्रवारी ५ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्याने त्याच्या आईला फोन करून अमळनेर येत असल्याचे कळवले होते. मात्र त्याला पहाटे झोप लागली. सकाळी ६ वाजेच्या सुमारास अमळनेर स्टेशनवरून गाडी सुटली आणि त्याला अचानक जाग आली. तो विप्रो पुल ते बोरी नदी पुलाच्या धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांचा अचानक पाय सटकला. तो खाली पडल्याने त्याचा पाय कापला गेला. तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागेवरचा मृत्यू झाला.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीसांनी घटनस्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. त्याच्याजवळील कागदपत्राच्या आधारे ओळख पटविण्यात आली. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास अशोक साळुंखे हे करीत आहे.