जळगाव मिरर | ८ नोव्हेबर २०२४
टेलिग्राम या सोशल मेसेजिंग अॅपवरील रमा लक्ष्मी नावाच्या व्यक्तीने ‘प्राईम रनर डॉट कॉम’ या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाइन जॉब व पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून राहुल कृष्णा चौधरी (वय २६, रा. जिल्हा परिषद कॉलनी, गणेश कॉलनी, जळगाव) या तरुणाला ४ लाख ७२ हजार ४६५ रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल चौधरी या तरुणाला ११ ते २१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत रमा लक्ष्मी नावाच्या महिलेने वारंवार ऑनलाइन संपर्क साधून वेळोवेळी नोकरी तसेच जास्तीच्या पैशाचे आमिष दाखवून यूपीआय व एनइएफटीच्या माध्यमातून पैसे घेतले. इतकी मोठी रक्कम गेल्यावर ना नोकरी. ना पैसा मिळाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राहुल याने जिल्हा पेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. १५ दिवसांनंतर गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार महेंद पाटील करीत आहेत.