जळगाव मिरर । १९ सप्टेंबर २०२५
भडगाव बस स्थानकाजवळील न्यू मिलन चहाच्या हॉटेलमध्ये १४ सप्टेंबरला झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटातील गंभीर जखमी सोहेल रफीक मनियार (वय २६) या तरुणाचा उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे मृत्यू झाला. त्याच्या निधनाचे वृत्त शहरात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भडगाव शहरातील बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या न्यू मिलन हॉटेलमध्ये गॅस सिलिंडर बदलताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात हॉटेल मालकाचा मुलगा सोहेल मनियार यांच्यासह १३ जण गंभीर जखमी झाले होते. ही दुर्दैवी घटना १४ सप्टेंबरला दुपारी दीडच्या सुमारास घडली होती. दरम्यान, स्फोटानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी भडगाव, पाचोरा येथे तर गंभीर जखमी झालेल्या सोहेलला धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. तर सोहेलची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्याला धुळे येथुन पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले होते.
मात्र, उपचार सुरू असतानाही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्याला मुंबईला हलवण्याची तयारी सुरू असतानाच, रात्री साडेसात वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली. मयत सोहेलच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. त्याचा दफनविधी १९ सप्टेंबरला होणार आहे. या घटनेमुळे मनियार कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.