जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२४
शहरातील शिरसोली रोडवरील विद्या इंग्लिश मीडियम स्कूल जवळ तरूणाला बेदम मारहाण करून हातातील चांदीचे ब्रेसलेट, मोबाईल आणि रोकड मिळून 14 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल लूटण्यात आला. ही घटना बुधवार 3 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घडला. याप्रकरणी चौकशी अंती अखेर शुक्रवार, 5 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील विद्यूत कॉलनीत कुणाल विजय सोनार (22) हा बुधवार, 3 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास मेहरुण परिसरातील विद्या इंग्लिश मिडीयम स्कूलजवळ रस्त्याच्या बाजूला उभा होता. यावेळी चार अनोळखी तरूण आले. त्याला काहीही कारण नसतांना चौघांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. यात त्यांच्या हातातील चार हजार रूपये किंमतीचे चांदीचे ब्रेसलेट, 10 हजारांचा मोबाईल आणि 950 रुपयांची रोकड असा एकूण 14 हजार 950 रुपयांचा ऐवज लूटून नेला.
हा प्रकार घडल्यानंतर शुक्रवार, 5 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता तरूणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.. तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.