जळगाव मिरर | ३० नोव्हेबर २०२४
भुसावळ शहरातील विकास कॉलनीत राहणाऱ्या एका तरुणाला शिवीगाळ करत हातावर लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर दुखापत करुन दीड हजारांची रोकड हिसकावून त्याची पत्नी व आईला ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना २८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता घडली. याप्रकरणी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळच्या विकास कॉलनीत तुषार माणिक चौधरी (वय ३५) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तो केबल ऑपरेटर म्हणून काम करतो. २८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता संशयित आरोपी हेमंत जगदीश पैठणकर (रा. शिव कॉलनी, भुसावळ) याने तुषारकडे इंडिका गाडी आणि १ हजार रुपये मागितले. त्यावर तुषारने गाडी आणि पैसे देण्यास नकार दिला.
या कारणावरून संशयित आरोपी हेमंत पैठणकर याने शिवीगाळ करून लोखंडी कोयत्याने वार करून तुषार चौधरी याला गंभीर जखमी केले. तर त्याच्या खिशातील दीड हजार रुपये बळजबरी हिसकावून घेतले. तसेच तुषारची पत्नी भावना आणि आई रेखाबाई यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, या घटनेबाबत तुषारने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन रात्री ११ वाजता संशयित आरोपी हेमंत पैठणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजीव सांगळे करत आहेत.