जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२५
गेल्या काही वर्षापासून राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचे आमिष देवून आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत असतांना आता पोलीस दलात भरती होऊन जनतेची सेवा करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, याच स्वप्नाचा फायदा घेत 19 वर्षीय तरुणीची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. मी गिरीश महाजन यांचा पुतण्या असल्याचे सांगत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सायखेड येथे एका तरुणीची फसवणूक करण्यात आली आहे. मी मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या आहे. मी पोलिस दलात नोकरी लाऊन देतो असे आमिष दाखवत 19 वर्षीय युवतीची फससवणूक करण्यात आली आहे. या तरुणीकडून आतापर्यंत साडेचार लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी अभिषेक प्रभाकर पाटील याने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार दिलीप बनकर आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचे असल्याचा दावा केला. त्याने निफाड तालुक्यातील औरंगपूर येथील स्वाती राजेंद्र चाबुकस्वार या तरुणीला पोलिस भरतीचे खोटे आश्वासन दिले.
अभिषेकने स्वाती आणि तिच्या आईला मुंबईला नेऊन दादर येथे काही दिवस ठेवले. तिथे त्याने त्यांना नियुक्तीची बनावट ऑर्डर दाखवली आणि एका अकादमीत प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर त्याने स्वातीच्या आईकडे आठ लाख रुपयांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येण्यापूर्वी स्वातीच्या आईने त्याला चार लाख रुपये दिले होते.
आपली फसवणूक लक्षात आल्यानंतर, 19 वर्षीय स्वाती राजेंद्र चाबुकस्वार हिने सायखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अभिषेक प्रभाकर पाटील याला अटक केली असून त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे नेत्यांच्या नावाचा वापर करून होणाऱ्या फसवणुकीचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. भाजपचे नाशिक जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनी अशा कृत्यांमुळे नेत्यांची बदनामी होते, असे सांगत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
