
जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२६
जळगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत शनीपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका लोकसेवकाला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पितांबर अहिरे (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी लोकसेवकाचे नाव असून ते शनीपेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे कार्यरत आहेत. तक्रारदार हे जळगाव येथील रहिवासी असून त्यांच्या मुलाविरुद्ध शनीपेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी आरोपी लोकसेवकाने तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार १३ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान आरोपी विनोद अहिरे यांनी तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ कारवाई करत त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणताही शासकीय कर्मचारी लाच मागत असल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोउप निरी.सुरेश पाटील, मपोहेकों.संगिता पवार, पोकों.राकेश दुसाने, पोकों.सचिन चाटे, पोकों.अमोल सुर्यवंशी यांनी कारवाई केली.






















